पीएम किसान नवीन अट लागू : या शेतकऱ्यांचा हप्ता बंद..
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील, म्हणजेच २२ वा हप्ता वितरित करन्याआगोदर शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यापुढे फक्त ज्या शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) आहे, त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने तो काढून घ्यावा, असे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. फार्मर आयडी बंधनकारक करण्यामुळे, अपात्र लाभार्थींना वगळण्यास मदत होणार असून योजनेच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
वास्तविक पाहता, २० वा हप्ता वितरित होण्यापूर्वीच फार्मर आयडीच्या आधारावर पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या होत्या. आता २२ वा हप्ता देत असताना फार्मर आयडीच्या बेसवर शेतकऱ्यांचे संपूर्ण व्हेरिफिकेशन (Verification) केले जाईल.
या प्रक्रियेमुळे, शेतकऱ्यांची वेगळी केवायसी (e-KYC) करण्याची आवश्यकता भासणार नाही, केवळ फार्मर आयडीद्वारे शेतकऱ्यांची ओळख पटवून ते पात्र आहेत की नाहीत, हे निश्चित केले जाईल. अशाप्रकारे, कुठलाही गैरप्रकार न होता, केवळ पात्र असलेल्या आणि खरीप-रब्बी हंगामात सक्रिय असलेल्या शेतकऱ्यांनाच सन्मान निधीचा लाभ देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाच राज्य शासनाच्या योजनांचे हप्ते देखील दिले जातात. महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीही हाच निकष लागू आहे. त्यामुळे, जर एखादा शेतकरी फार्मर आयडी नसल्यामुळे पीएम किसान योजनेतून अपात्र ठरला, तर तो नमो शेतकरी योजनेतूनही आपोआप अपात्र ठरणार आहे.
पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते नियमितपणे मिळवण्यासाठी फार्मर आयडी असणे हे आता अत्यंत बंधनकारक झालेले आहे. फार्मर आयडी काढताना काही समस्या येत असल्यास, शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या कार्यक्षेत्रातील तलाठी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून ती समस्या सोडवून घ्यावी, जेणेकरून हप्ता थांबणार नाही.