महसूल विभागाचा मोठा निर्णय ; आता सातबारावर तलाठ्यांच्या सहीची गरज नाही ; राज्यातील शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाने घेतलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या निर्णयामुळे, आता डिजिटल स्वरूपात दिला जाणारा सातबारा उतारा सर्व प्रकारच्या कामांसाठी पूर्णपणे कायदेशीर व वैध मानला जाणार आहे. या संदर्भात महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या नवीन नियमानुसार, बँकेची कामे असोत, न्यायालयातील प्रक्रिया असोत किंवा कुठल्याही शासकीय आणि निमशासकीय कामांसाठी हा डिजिटल स्वाक्षरी केलेला सातबारा (Satbara Utara) स्वीकारला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांची तलाठी कार्यालयातील हेलपाटे मारण्याची आवश्यकता आता कमी झाली आहे. शेतकरी फक्त १५ रुपयांमध्ये ऑनलाईन पोर्टलवरून आपला सातबारा डाऊनलोड करून त्याचा वापर करू शकतात. विशेष म्हणजे, तलाठ्यांकडून सही-शिक्क्यासह दिला जाणारा सातबारा तसेच डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा, हे दोन्ही उतारे आता कायदेशीररित्या मान्य करण्यात आले आहेत. यापूर्वी डिजिटल सातबारा अनेकदा स्वीकारला जात नसे आणि तलाठ्याच्या स्वाक्षरीची मागणी होत असे, ज्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत होती.
















