राज्यात एवढे दिवस गोठवनारी थंडीची लाट…डॉ. मच्छिंद्र बांगर
हवामान तज्ज्ञ डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या अंदाजानुसार, सध्या महाराष्ट्रासह मध्य भारतावर तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे, जी हळूहळू वाढत जाईल. नोव्हेंबरमध्ये जसा थंडीचा प्रभाव होता, तशीच तीव्रता आता डिसेंबरमध्येही कायम राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या लेटेस्ट बुलेटीननुसार, पंजाब, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यांसह विदर्भ आणि तेलंगणामध्ये देखील तीव्र थंडीची लाट राहण्याचा अंदाज आहे.
ही थंडीची लाट सध्या सौम्य असली तरी, येत्या काळात ती प्रत्येक दिवसागणिक वाढत जाणार आहे. या दरम्यान, पूर्वेकडील राज्ये आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागामध्ये धोक्याचे सावट (धुके) राहण्याची शक्यता आहे.
देशाच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दोन्ही टोकांवर सध्या दोन प्रमुख हवामान प्रणाली सक्रिय होत आहेत, ज्यामुळे हवामानामध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. उत्तर भारतात येणारे वेस्टर्न डिस्टर्बन्स (डब्ल्यूडी) हे थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ घडवून आणणार आहेत. अति उत्तरेकडील भागात सध्या बर्फवृष्टी सुरू असून, पुढे पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाख यांसारख्या बहुतांश उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा प्रभाव पडणार आहे.
तर दुसरीकडे, बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि दक्षिणेकडील भागात कमी दाबाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या प्रणालीमुळे दक्षिण भारतामध्ये केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि रायलसीमा या भागांमध्ये मोठ्या पावसाळी क्षेत्राची निर्मिती होऊ शकते.
एकूणच, संपूर्ण देशातील वातावरण मोठ्या प्रमाणात बदलत आहे. भारताच्या दोन टोकांना वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे— उत्तरेत बर्फवृष्टी आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये कमी दाबामुळे पाऊस. काही डब्ल्यूडी तयार होतात, परंतु भारतावर पोहोचेपर्यंत ते विरून जातात, तर काही तीव्र होऊन प्रभावी ठरतात, त्यामुळे नेमके हे वातावरण कशा पद्धतीने बदलते यावर हवामान विभागाचे लक्ष आहे. या सर्व मोठ्या बदलांदरम्यान, देशाच्या मध्य भागावर म्हणजेच महाराष्ट्रासह मध्य भारतावर मात्र थंडीची लाट कायम राहणार आहे.