राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या (६ डिसेंबर २०२५) राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा यासह सर्वच भागांत ढगाळ वातावरण राहील. हे ढगाळ वातावरण केवळ आजचा दिवस (६ डिसेंबर) आणि उद्या दुपारपर्यंत (७ डिसेंबर) कायम राहील. या काळात दिवसा देखील धुकं (धुई) राहील, ज्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, सर्व शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घ्यावी की, हे ढगाळ वातावरण असले तरी राज्यात पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे सध्या पाऊस येईल या भीतीने कोणतेही काम थांबवण्याची गरज नाही.
थंडीची लाट आणि तापमानातील बदल राज्यातील ढगाळ वातावरण उद्या (७ डिसेंबर) दुपारनंतर निवळेल आणि याच दिवशी म्हणजेच ७ डिसेंबरपासून राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात होईल. ही थंडीची लाट जवळपास २० डिसेंबरपर्यंत वाढतच जाणार आहे. या काळात उत्तरेकडून वारे वाहत असल्यामुळे दिवसा देखील चांगला थंड झिलावा (गारवा) जाणवेल.
नाशिक, निफाड, जळगाव, नांदुरा तसेच विदर्भातील काही पट्ट्यांमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवेल. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा येथील द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की, उद्यापासून चांगल्या प्रकारे सूर्यदर्शन होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आणि पीक संरक्षण सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि धुईमुळे पिकांवर परिणाम होऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांनी हरभऱ्याची लागवड केली आहे, त्यांना या काळात पाणी देता येईल आणि फवारणी देखील करता येईल. वातावरणामध्ये धुई (धुकं) असल्यामुळे फुलधारणेच्या अवस्थेत असलेल्या पिकांना या धुईचा फटका बसतो.
त्यामुळे अशा पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला डख यांनी दिला आहे. या काळात थंडी अधिक असल्यामुळे गव्हाचे पीक आणि हरभऱ्याचे पीक चांगले येण्याची शक्यता आहे. तसेच, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशात देखील आज ढगाळ वातावरण राहील, पण ८ डिसेंबरपासून तिकडेही थंडीची लाट सुरू होणार आहे.