खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार ; मागील खरीप हंगामात पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात जानेवारीपासून विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. सध्या मूग, उडीद या पिकांचे कापणी प्रयोग संपून त्या पिकांच्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. आता बाकीच्या पिकांची माहिती पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे.
पीक कापणी प्रयोगानंतर आलेले उत्पन्न (उंबरठा उत्पन्न) व मागील सात वर्षांतील चांगल्या पाच वर्षांतील उत्पन्नाची तुलना होते. त्यातून सध्याच्या अपेक्षित उत्पन्नाची तुलना होऊन उंबरठा उत्पन्नानुसार जोखमेची रक्कम निश्चित होते. त्यातही प्रत्येक पिकांसाठी मंडळे, तालुके अधिसूचितकरण्यात आले आहेत. त्यानुसार त्या मंडळ व तालुक्यातील पीकविमा भरलेल्या बाधित शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम दिली जाते. एखाद्या मंडळ किंवा तालुक्यातील सर्वच पिकाचे नुकसान झाले, पण त्याठिकाणी त्या पिकांसाठी अधिसूचित केलेले क्षेत्र नसल्यास विमा मिळत नाही. आता कोणत्या तालुक्यातील किंवा मंडळातील किती शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या कार्यवाही कोणत्या टप्प्यावर ?
पीकविमा योजनेअंतर्गत मागील खरीप हंगामातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. त्यात मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांचा समावेश आहे. कांदा, तूर व मका या पिकांचे कापणी प्रयोग अंतिम टप्प्यात आहेत. पीक कापणी प्रयोगानंतर त्या पिकांच्या आलेल्या उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. बाकीच्या पिकांच्या उत्पन्नाचीही माहिती डिसेंबरअखेर शासनाला पाठविली जाणार आहे. त्यानंतर अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न व मागील सात वर्षांतील उत्पन्नाची सरासरी, यातून सध्याचे कमी आलेले उत्पन्न निश्चित होईल. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पीकविमा मिळेल, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, तूर, मका अशा पिकांचे उत्पन्न घेतले जाते. खरीप पीकविमा योजनेंतर्गत काही पिकांचे कापणी प्रयोग झाले आहेत. काहींचे कापणी प्रयोग काही दिवसांत होतील. त्यानंतर उत्पन्नाची माहिती शासनाला पाठविली जाते. त्यानुसार नुकसानीचे प्रमाण निश्चित होऊन विमा कंपन्यांकडून पात्र शेतकऱ्यांना भरपाई मिळेल.
शुक्रचार्य भोसले,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर